नर्मदेश्वर महादेव मंदिर सिडको एन-१ येथून निघणार शोभायात्रा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महेश नवमीनिमित्त श्री माहेश्वरी मंडळातर्फे १९ ते २३ जून या कालावधीत विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी नर्मदेश्वर महादेव मंदिर सिडको एन-१ येथून शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुनील मालाणी व सचिव अनिल बाहेती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महेश नवमी हा माहेश्वरी समाजाचा प्रमुख उत्सव असून समाजबांधव तो मोठ्या उत्साहात साजरा करतात. महेश नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ जून रोजी जीवन के गीत हा कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिरात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. दि. २० जून रोजी सिंगिंग टॅलेंट स्पर्धा
दुपारी ४ ते ७ यावेळेत व प्रभुदर्शन भक्तिमय भजन संध्याचे सायंकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ जून रोजी योगोत्सव, ट्रेझर हंट, शक्तिसंगम, बुद्धिबळ स्पर्धा, क्विझ मास्टर, सुन्दर हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच जनरेशन स्वॅप हा सर्व वयो गटातिल समाज बांधवासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम शहरातील विविध प्रभाग, महिला मंडळ, महेश यूथ क्लब तसेच महेश्वरी संस्थांच्या सहकार्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात येत आहेत. दि. २३ जून रोजीचे प्रमुख कार्यक्रम होईल. महेश नवमीच्या दिवशी सकाळी खडकेश्वर मंदिर येथे रुद्राभिषेक, महेश चौक पूजन, दुचाकी व चारचाकी रॅली, रक्तदान शिबिर तसेच माहेश्वरी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यक्रमास बृज सारडा यांची उपस्थिती
दि. २३ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता नर्मदेश्वर महादेव मंदिर, एन-१, सिडको येथून शोभायात्रेला प्रारंभ होईल. यानंतर मुख्य कार्यक्रमास नागपूर निवासी बृज सारडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्षा रेखा राठी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. माहेश्वरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस महेश नवमी उत्सव प्रकल्प प्रमुख अमित सोनी, सनील बिर्ला, सीए गोपाल जाजू, सीए अशोक राठी यांच्यासह अनिल बाहेती, शिवप्रसाद जाजू, भिकमचंद मल, सी.एस. सोनी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.









